ConversationsGuest AuthorMarathiMultilingual

तीन वर्षांपूर्वी…

बरोबर तीन वर्षांपूर्वी आजच्या दिवशी माझं  शाळेपासून जपलेलं स्वप्न पूर्ण झालं.  भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजेच IAS मध्ये माझी निवड झाली. सगळे म्हणले होते की आता तुझं आयुष्य कलाटणी घेणार, सगळं सगळं बदलणार. घर, आई , बाबा, मित्र मैत्रिणी सगळं लांब जाणार. कामापलीकडे आता कशालाही प्राधान्य देता येणार नाही, इच्छा असून देखील वेळ मिळणार नाही. बरं , या सगळ्यांबरोबर घर गाडी मान सन्मान  पैसे इत्यादी सगळं धावून येणार असा दिलासाही अनेकांनी दिला. ते पण IAS नव्हते आणि आणि मी पण नाही. या सर्व भाकितांमधील नेमकं काय खरं ठरणार हे काळच सांगणार होता.

मला वाटत तीन वर्ष म्हणजे लोकांनी माझी बडबड ‘seriously’ घेण्याइतका काळ उलटला असावा. टेबलाच्या तिकडून इकडे आल्यावर मला काय अनुभव आले, कसे आले, कसे गेले  इत्यादि बाबत लिहायची इच्छा होती खूप दिवस. आजच्या शुभमुहूर्तावर हा माझा पहिला ब्लॉग.

टेबलाच्या पलीकडे जाण्याची हौस अगदी लहानपणापासून होती. पलीकडे जाऊन काय करावं लागतं आणि नेमक कशाला सामोरं जावं  याची काहीही कल्पना नसताना देखील तिथे जायचं हे नक्की होतं. माझ्यात हा निश्चय कुठून आला या प्रश्नांनी मलाच अनेकदा बुचकळ्यात टाकलं आहे.  टेबलाच्या अलीकडे राहून मर्यादितच प्रभाव पाडता येतो पण पलीकडे मात्र सगळं शक्य हे थोरामोठ्यांनी अनेकदा सांगितलेल मला आठवतंय. तिथूनच आला असावा निश्चय. लहानपणी हे असच होतं असावं बहुतांश  लोकांच्या बाबतीत. आपण ज्यांना आदर्श मानतो किंवा ज्यांचा आपल्या आयुष्यावर प्रभाव असतो त्यांच्या सांगण्यावरून एखादी नोकरी किंवा क्षेत्र आपण निवडू बघतो. हे अगदी नैसर्गिक आहे. शिवाय भारतीय प्रशाकीय सेवा  किंवा IAS बद्दल आपण सतत काय काय ऐकत असतो. त्या टेबलाच्या पलीकडे काय भलती दुनिया आहे याची अनेकांना उत्सुकता असते. मी पण त्यातलीच  एक होते. आणि एकूणच रस्त्यावर कचरा करणे, सिग्नल तोडणे आणि राष्ट्रगीताच्या वेळी चुळबूळणे याचा मला लहानपणापासून होणारा संताप म्हणजे माझ्या करिअर साठी दुधात साखरेसारखं होतं. या सगळ्या गोष्टींनी मला एकदम पटवून दिलं होतं की हेच माझं क्षेत्र आहे.

या सर्व  विचारांतून, निश्चयातून, प्रभावतून आणि अर्थातच वेळी केलेल्या कष्टातून मी IAS  झाले. ती भलती दुनिया मी अगदी IAS झाल्याच्या दुसऱ्या क्षणापासून अनुभवली. सचिन तेंडूलकरच्या पत्रापासून मुख्यमंत्रांच्या भेटीपर्यंत सगळं मिळत होतं. शिवाय समाजासाठी आणि देशासाठी काहीतरी मोठं करायला मिळणार याचा खूप आनंद वाटत होता. अर्थात त्या वेळी रस्त्यावरच्या मिणमिणत्या आणि कधीकधीच जळणाऱ्या दिव्यापासून धार्मिक हिंसेमुळे होणाऱ्या कत्तलींपर्यंत सगळेच एक IAS अधिकारी बदलू शकते असा भाबडा समज माझा होता खरा. त्या वेळी तो गरजेचा होता. आदर्शवादापासून सुरुवात करून अनुभवांच्या संगतीने व्यवहारिकता समजून घेण्यात मजा आहे. मग या दोघांचा छान मेळ घालून अगदी सुवर्णमध्य जरी नाही सापडला तरी रुपेरी पर्यंत पोहोचायला हरकत नाही.

अशाच काही प्रयत्नात मी गेली तीन वर्ष आहे. काम करता करता तसेच कामानिमित्ताने किंवा इतर काही कारणाने ज्येष्ठ अधिकाऱ्यांशी होणाऱ्या भेटीतून एक गोष्ट मी नक्की शिकली आहे आणि मनाशी पक्की केली आहे. या सेवेत जितकी दारं उघडली तितकीच कुलुपं देखील लागली. कोणत्या दारात शिरायचं आणि कोणत्या कुलूपाकडे दुर्लक्ष करायचं हे आधीच ठरवलेलं बरं.

This slideshow requires JavaScript.

अशाच विविध दारं आणि कुलुपांबद्दल मी लिहायचा ठरवलं आहे. टेबलाच्या पलिकडून हे अनुभव लिहिल्यावर मलाही ते अजून स्पष्ट होत जातील कदाचित.

 

Leave a Reply