ConversationsMarathiMultilingual

‘योगा केला’

आज जागतिक योग दिना निमित्त जगभर मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रम राबविण्यात आले. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य आणि आध्यात्मिक परिपूर्णते करिता भारताने संपूर्ण जगाला ‘योग’ रूपात अत्यंत महत्वाची धरोहर बहाल केली आहे.

 

भारतात सुद्धा ठिकठिकाणी विविध कार्यक्रम राबविण्यात आले. ह्या कार्यक्रमांच्या बातम्यांनी वृत्तवाहिन्यांच्या prime slots वर एकेरी हक्क गाजवला आहे. खरच आनंद आहे.

 

पण ह्या वाहिन्यांचे सूत्रधार ‘योग’ चा ‘योगा’ म्हणून जो सातत्याने उच्चार करत होते ते मात्र कानाला झोंबण्या सारखं होतं. बोबड्या इंग्रजांनी ‘योग’ च ‘Yoga’ असं spelling केलं आणि आपल्या भारतीयांनी तो भ्रष्ट उच्चार प्रचलित केला.

 

बरं.. पुढे बातमी देताना वृत्तवाचक ‘अमुक मान्यवरांनी योगा केला- तमुक मान्यवरांनी योगा केला’ हे जे बरळत होते तो म्हणजे कहरच म्हणावा लागेल. ‘योगा केला’?? म्हणजे नेमका काय ‘केला’?? काय करून टाकला एकदाचा? योगा केलाचा काही अर्थ तरी लागतो का?

 

योग ह्या शब्दाचे मूळ ‘युज्’ धातू मध्ये आहे त्याचा अर्थ ‘योजना करणे’ किंवा ‘जोडणे’ असा आहे. इथे योग म्हणजे अतिशय सोप्या भाषेत अंतरबाह्य (बाह्य इति शरीर आणि अंतर इति आत्मा) ह्यांच्यात योजना घडवून आणणे! ‘योगा केला’ म्हणणे म्हणजे स्वयंपाक करणे ह्याला आजकालच्या फॅशन प्रमाणे ‘जेवण बनवणे’ म्हणण्या इतकंच आपली भाषा भ्रष्ट झाल्याचे संकेत देणारं आहे.

 

आपण संपूर्ण जगाला इतकी मोठी संस्कृतीक आणि आध्यात्मिक धरोहर दिली आहे. आपल्या नावाचा उच्चार करण्यात कोणी फारकत केली तर आपल्याला जस वाईट वाटतं तसच योग ऐवजी योगा असा अयोग्य उच्चार करणं चूक नाही का? निदान आपण जे की ह्या संपदेचे धनी आहोत त्यांनी तरी व्यवस्थित उच्चार करावा!

 

बाकी ‘योगा केला’ म्हणजे योग शब्दाचा अपभ्रंश करून त्याचा योगा केला इतकाच अर्थ काढता येईल मला तरी!

 

– अमेय श्रीपाद रानडे

 

Leave a Reply